शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आजपासून अंतिम सुनावणी
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या अंतिम सुनावणी सुरू करणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे कार्यतालिकेतील 19 व्या क्रमांकावर ही सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मागील तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या या याचिकेवर न्यायालय अंतिम सुनावणी घेणार आहे. शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे. तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेतून केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्ज करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास रोखण्याची मागणी अंतरिम अर्जाद्वारे केली आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ अंतिम सुनावणी सुरू करणार आहे. बुधवारी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात अंतिम युक्तिवाद करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे न्यायालयात याआधीच सविस्तर लेखी म्हणणे आणि पक्ष-निवडणूक चिन्हासंबंधी भक्कम कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे सुनावणी लवकर पूर्ण होऊन ‘खऱ्या’ शिवसेनेला न्याय मिळण्याची चिन्हे आहेत. पक्षचिन्ह आणि गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल, अशी चिन्हे आहेत. पुनः पुन्हा तारीख मिळणे आणि या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. असीम सरोदे यांनी दिली.
‘या’ याचिकांवर होणार सुनावणी
z विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवले. या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर एकत्रित सुनावणी होणार आहे. z केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह वापरण्यास मुभा दिली होती. निवडणूक आयोगाचा तो निर्णय रद्द करण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मूळ याचिकेद्वारे केली आहे. तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या याचिकेवर अखेर अंतिम सुनावणी होणार आहे.
‘या’ मुद्दय़ांवर होणार युक्तिवाद
z ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ‘सिम्बॉल रुल’ला धरून आहे का? z निवडणूक आयोगाला केवळ पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत पक्ष कोणाचा आहे हे आयोग ठरवू शकतो का? शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव वापरण्यास मुभा देत आयोगाने अधिकार कक्षा ओलांडली आहे का? z ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आहे. ते पक्षाचे निवडणूक चिन्ह नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेताना निवडणूक आयोगाने अधिकाराचा अवास्तव वापर केला आहे का? हादेखील कायदेशीर मुद्दा अंतिम सुनावणीच्या केंद्रस्थानी असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List