पाऊलखुणा – घोटणचा मल्लिकार्जुन

पाऊलखुणा – घोटणचा मल्लिकार्जुन

>> आशुतोष बापट

यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडविणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला नगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. छत्रपती संभाजीनगर आणि बीड या मराठवाडय़ातील जिह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिह्यावर बऱयाच ठिकाणी मराठवाडय़ाचा प्रभावसुद्धा जाणवतो. नगर जिह्याचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात. पुढे इ.स.च्या 10 ते 14 व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडविणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

‘घोटण’ नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतापर्यंत जाते. कौरव आणि जरासंधाने विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘घोटण’ असा झाला. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली. त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’. यादवकालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्राकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मंदिराच्या सभामंडपात 16 खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्लयुद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन, तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात 16 पैकी मधील चार खांबांवर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत.

असेच अजून एक स्थापत्यनवल पुढे बघायला मिळते ते म्हणजे इथे असलेला गाभारा. साधारणत शिवमंदिराचा गाभारा हा तीन-चार फूट खोल असून त्यात शिवपिंडी असते. इथे चक्क 15 फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यांत विभागाला आहे. पाच पायऱया उतरून गेलो की, आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा, तर दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा चार खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून दहा पायऱया उतरून खाली गेलो की, मग शिवपिंडी दिसते. मुख्य गाभाऱयाच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा अत्यंत देखण्या अशा द्वारशाखांनी सजवलेला आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाजाच्या डोक्यावर मधोमध असलेले ललाटबिंब. इथे शक्यतो गणपती अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते, पण घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची मूर्ती आहे. देवाच्या गुरवपदाचा मान अनेक पिढय़ांपासून शिंदे घराण्याकडे चालत आलेला आहे. त्यांचाकडे काही सनदा बघायला मिळतात. शिक्षणाने अभियंता असलेले दिलीप केशव शिंदे सध्या देवाचे गुरव आहेत.

याच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर बघता येतात. पैठणपासून जेमतेम 15 किमीवर असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्यूशनला चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक ट्यूशनला चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
कोलकात्यात बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दम दम परिसरात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या...
देवदर्शनाहून परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकला धडकली, अपघातात 18 जणांचा मृत्यू
Pune News – भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, अंगणात खेळणाऱ्या मुलाला बिबट्याने ओढून नेले
घरात बसून सिगारेट फुकणार्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यावर बोलू नये, पालकमंत्री शिरसाट यांना दानवे यांचे सडेतोड उत्तर
लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्ही पण या चुका करता का?
भाजपच्या माजी सभागृह नेत्यासाठी एसटीपी निविदेचा अट्टहास, शिवसेनेचा आरोप
सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह