वेधक – वृक्ष चळवळ उभारणारा ‘ट्री मॅन’
>> अभय मिरजकर
‘केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे,’ असे म्हणतात. परंतु हे कृतीत उतरवून तब्बल 30 हजार वृक्ष लागवड करत वृक्ष चळवळ उभी करणारा ‘ट्री मॅन’ नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पाणबोशी येथील शिवसांब घोडके होय. त्यांच्या कार्याची दखल घेत अनुकरण केले तरी मराठवाडय़ातील वृक्ष लागवडीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढू शकते. ‘दररोज एक रोप’ ही संकल्पना राबवून एकटय़ाने सुरू केलेल्या या चळवळीत आता अनेकजण जोडले गेले आहेत. वनरक्षक म्हणून काम करणारे शिवसांब घोडके यांनी कंधार तालुक्यातील झाडांचे अत्यल्प प्रमाण पाहून वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला. शासकीय वृक्ष लागवड म्हणजे दरवर्षी एकच खड्डा आणि तिथेच वृक्षारोपण व फोटो सेशन असे म्हणत वृक्षलागवड चळवळीचा फज्जा उडाला आहे. म्हणूनच शिवसांब घोडके यांनी स्वतच्या वाढदिवसाच्या निमित्त 27 ऑक्टोबर 2021 पासून रोज स्वत एक रोप लागवडीचा संकल्प केला व ही चळवळ सुरू केली.
गावातीलच सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरील खडकाळ भागात सुरू केलेल्या या चळवळीची माहिती फोटो, व्हिडीओ, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून करत त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर लोकांचाही ओघ वाढू लागला. नागरिकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड करायला सुरुवात झाली. त्यातूनच ‘निसर्गसेवा गट पानबोशी’ तयार झाला. वाढदिवस, लग्न वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, नोकरी लागल्याच्या निमित्ताने, प्रिय व्यक्तींच्या स्मृती, शाळेतील विद्यार्थी यांची सहल काढून विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड या व अनेक कारणांनी आजपर्यंत 23 हजारपेक्षा जास्त रोप लागवड झाली आहे. या रोपांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा करून त्यास पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या उपलब्ध व्हावे यासाठी मंदिर माळावरती माथा ते पायथा जल योजना केली आहे. तसेच त्यामध्ये कमी पाण्यात जगणारी देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची, स्थानिक वृक्षांची निवड करण्यात आली आहे. पहिले लागवड केलेले वटवृक्षाचे रोप आज सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीपर्यंत वाढलेले आहे. आजपर्यंत तीस हजारांहून अधिक झाडं लावली आहेत. वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन या कार्यामध्ये शिवदास यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून ग्रामपंचायत कार्यालय पाणबोशी यांच्याकडून या कार्याची दखल घेऊन ‘ट्री मॅन ऑफ पानबोशी’ या नावाने सन्मानित करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List